चंद्रपूर : चंद्रपूरमधील शेतकऱ्याच्या कर्जफेडीसाठी त्याची किडनी काढण्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी एका मोठ्या देशांतर्गत किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे संबंध दिल्ली, तामिळनाडू आणि कंबोडियाशी असल्याचे आढळून आले. तपासामध्ये दिल्लीचे डॉ. रविंदर पाल सिंग आणि त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजरत्नम गोविंदास्वामी यांची नावे तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये मुख्य आरोपी कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू तसेच हिमांशू भारद्वाज यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे कबूल केले. हिमांशू भारद्वाज याने डोनर असल्याचे कबूल केले. त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयात दिल्लीचे डॉ. रविंदर पाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्या देखरेखीखाली त्यांची मूत्रपिंड काढून टाकण्यात आल्याचे उघड केले. तांत्रिक पुराव्यांवरूनही रुग्णालयात यापूर्वी अनेक बेकायदेशीर प्रत्यारोपण करण्यात आल्याची पुष्टी झाली. तपासामध्ये असे दिसून आले की, रुग्णांकडून गोळा केलेल्या पैशाचा मोठा भाग डॉक्टर आणि मध्यस्थांमध्ये विभागला गेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. रविंदर पाल सिंगला प्रत्येक प्रकरणात अंदाजे 10 लाख रुपये मिळाले, डॉ. राजरत्नमला रुग्णालय व्यवस्थापनाच्या नावाखाली अंदाजे 20 लाख रुपये मिळाले. मुख्य एजंट कृष्णा यालाही अंदाजे 20 लाख रुपये कमिशन म्हणून मिळाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्ली आणि त्रिची येथे पाठवण्यात आले. ट्रान्झिट रिमांड सुनावणीदरम्यान स्थानिक न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तरीही डॉ. रविंदर पाल सिंग यांना दिल्लीमध्ये ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डॉ. राजरत्नम गोविंदास्वामी याला अटक करण्यासाठी पोलिसांचे छापे सुरूच आहेत.