Chandrapur News : रानटी हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. दोन हत्तींच्या हल्ल्यात 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मारोतील मसराम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांना पाच मुले आहेत.
फादर्स डेच्या दिवशीच पाच मुलांचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारोती मसराम हे सकाळी नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या मोकळ्या शिवारात शौचासाठी गेले होते. त्याचवेळी दोन हत्ती या भागात पोहोचले. हत्ती तिथे आल्याने मारोती अचानक उभा झाला.
यामुळे हत्ती बिथरले आणि त्यांनी मारोतीला सोंडेत पकडून जमिनीवर आपटले. यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. मारोती मसराम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.





