चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला थेट महापौरपदाची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. भाजपला २३ जागा, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ३ नगरसेवक काँग्रेससोबत असल्याने तिचे संख्याबळ ३० वर पोहोचले आहे. मात्र, सत्तेसाठी आवश्यक असलेला ३४ चा आकडा कोणालाही गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाचे ६ नगरसेवक ‘किंगमेकर’ ठरू शकतात. वंचित बहुजन आघाडीचे २, अपक्ष २ तसेच बसप आणि एमआयएमचा प्रत्येकी १ नगरसेवक असल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या पाठिंब्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी मिळून ८ नगरसेवकांचा गट निर्णायक भूमिकेत आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची चर्चा असून, ठाकरे गटाला महापौरपद देऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या हालचाली महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, आतापर्यंत महाआघाडीत राहून अनेकदा पदांपासून वंचित राहावे लागले, मात्र यावेळी महापौरपदावर शिवसेनेचाच दावा आहे. जो पक्ष महापौरपद देईल, त्यालाच पाठिंबा दिला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस बहुमतापासून अवघ्या चार जागा दूर असली तरी शिवसेनेची अट मान्य करणे तिला अवघड जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसकडून थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने “महापौर आमचाच होईल” असा दावा केल्याने राजकीय संभ्रम अधिकच वाढला आहे. आता चंद्रपूरचा महापौर कोण होणार आणि कोणती आघाडी सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.