Chandrapur Congress : चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Congress) महापौरपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महापौर पद काँग्रेसकडेच राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पक्षातील दोन गटांमधील मतभेद आणि अंतर्गत लाथाळ्यांमुळे निर्णय प्रक्रिया रखडली आहे. या मुद्द्यावर तोडगा (Chandrapur Congress) काढण्यासाठी काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, पक्षातील अंतर्गत कलह सोडवण्याचे अधिकार आता ‘हाय कमांड’कडे सोपवण्यात आले आहेत. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून, मित्रपक्षांसह बहुमत मिळवण्याची शक्यता आहे. तरीही गटबाजीमुळे महापौर निवडीत अडथळा निर्माण झाला आहे. Vijay Wadettiwar वडेट्टीवारांचा राष्ट्रवादी आणि भाजपवर जोरदार हल्ला नागपुरात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया पूर्ण होण्याआधी घरातील कामकाज सुरळीत होत नाही. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की, कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम राबवण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊ नयेत, हा कट रचला गेला आहे.” वडेट्टीवार पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि अजित पवार गट यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. पण अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन पक्ष विलीन होण्याबाबत जास्त चर्चा झाली. त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे नव्हते का? की भाजप किंवा मुख्यमंत्र्यांची परवानगी लागत होती? अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा विलीनीकरणावर जास्त बोलले गेले. काही लोकांना याचा आनंद झाला. मोठ्या नेत्याच्या निधनानंतर दोन-चार दिवसही थांबता आले नाहीत. यातून राजकारणातील नैतिकता आणि नीतिमत्ता पूर्णपणे नष्ट झाली आहे, हे महाराष्ट्र पाहत आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडेट्टीवारांना प्रत्युत्तर वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत फटकारले. ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांनी आधी चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पळवापळवीबाबत आधी स्वतःच्या पक्षातील गोंधळ सुटवावा. आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. फार बोलण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेसच्या कोणत्या गटाचा नगरसेवक महापौर होतोय, याची काळजी घ्यावी.” चंद्रपूर महापालिकेचे राजकीय चित्र चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांसह (जनविकास सेना इ.) सर्वाधिक जागा मिळवल्या असून, पक्ष स्वतंत्र बहुमताच्या जवळपास आहे. मात्र, अंतर्गत गटबाजी आणि इतर पक्षांच्या (ठाकरे गट, भाजप इ.) हालचालींमुळे महापौर निवडीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नगरसेवक पळवण्याच्या आरोपांनाही उजाळा मिळाला आहे. दिल्लीतील उद्याच्या बैठकीत काँग्रेस हाय कमांड हा तिढा सोडवेल की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.