Chandrakant Patil – मराठी भाषेचा गौरव आणि साहित्याचा जागर मांडणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. पुण्यातील बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे पुस्तक महोत्सव, महापालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, शंभराव्या संमेलनाबाबत आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू आहे. तरुण पिढी वाचत नाही, हा समज चुकीचा असून. मागील पुस्तक महोत्सवाला मिळालेली १५ लाख प्रेक्षकांची उपस्थिती हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. मंत्री उदय सामंत (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पालिका विरोधी पक्षनेते नीलेश निकम, मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, श्यामकांत देवरे, राजीव तांबे, अरुण गीते, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सुनील महाजन आदी उपस्थित होते. या वेळी मराठी शब्दकोषाचे प्रकाशन; तसेच मराठी शब्दकोश ॲपचा शुभारंभ करण्यात आला. विकसित भारत आणि महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास, आपल्याला पुस्तकांची, कलेची आणि साहित्य संस्कृतीची जोड द्यावी लागणार आहे. पुढील चार दिवस जत्रा सुरू राहणार असून, त्यात लहान मुलांसाठी १०० पुस्तकांची दालने आहेत. – राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव