– राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप
कोल्हापूर – राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे ते कोल्हापुरात बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यालय परिसरात आले होते. यावेळी राजू शेट्टी यांना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारला असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
साखर कारखानदारांबरोबर मी सेटेलमेंट केली असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तो त्यांनी सिद्ध करुन दाखवावा असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी दिले. दादा राज्यातील दोन नंबरचे मंत्री आहेत. दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री असा मी अर्थ लावतो, असाही घणाघात राजू शेट्टी यांनी केला. तुमच्याकडे “इडी’ आहे, “सीबीआय’ आहे, धाडी टाका आणि जनतेला सांगा. माझ्याकडेही दादांच्या विरोधातील पुरावे आहेत. त्यांनी बिंदुचौकात समोरासमोर यावे असे आव्हानच खासदार राजू शेट्टी यांनी दादांना दिले.