कोल्हापूरः दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचा आम आदमी पार्टी एक घटक पक्ष आहे, पण दिल्लीतील विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढविल्याने त्याचा फटका त्यांना निकलांत बसला असल्याचे सांगितले जात आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दिल्लीची निवडणूक एकत्र न लढल्याने त्यांना मोठा फटका बसल्याचे विधान केले होते. राऊत यांच्या या विधानावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस व आम आदमी पक्षाला एकत्र यायला कोणी अडवले होते का? असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांच्या विधानाला केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत इतके महान नेते आहेत की, ते त्यांच्यात समझोता घडवू शकले नाहीत. त्यांना जादुच्या कांडीने रिझल्ट मिळतात, असे वाटत असेल, तर त्यांनी रोज सकाळी माध्यमांशी बोलण्यापूर्वी साधना करावी, असा खोचक टोला पाटील यांनी राऊतांना लगावला. ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा न देता ‘आप’ला दिला, तेथेच मोठी ठिणगी पडली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल, अशी शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा पाटील यांनी यावेळी बोलताना केला. तसेच उद्धव ठाकरे यांची स्थिती नाचता येईना अंगण वाकडे, अशी झाली कोपरखळीही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावली.
एकाही महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नाही.
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना इतर योजनांचा लाभ घेत असल्यामुळे तसेच चाकीचाकी असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे मिळालेल्या लाभाचे पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा महिलांमध्ये होत आहे. यावर यातील एकाही महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.