नवी दिल्ली – चंदीगड महापालिका निवडणुकीत बहुमत नसताना भाजपच्या उमेदवाराला महापौर विजयी घोषित करण्यात आल्याच्या प्रकरणात आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. या प्रकरणी कॉंग्रेस व आम आदमी पक्षाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाने नकार देऊन हे प्रकरण २६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले होते.त्यानंतर आप पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने उपस्थित राहून या प्रकरणाचा उल्लेख केला. सिंघवी यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीच्या मतमोजणीत पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकांमध्ये जी धुळफेक केली आहे ती व्हिडिओमध्ये पकडली गेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची तातडीने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. ३६ सदस्यांच्या चंदीगड महापालिकेत कॉंग्रेस व आप पक्षाची आघाडी झाली आहे आणि या आघाडीकडे २० मते आहेत. प्रत्यक्ष मतदानात त्या आघाडीच्या उमेदवाराला २० मते मिळाली असताना पीठासीन अधिकाऱ्याने त्यातील आठ मते बाद झाल्याचे घोषित करून भाजप उमेदवाला विजयी घोषित केल्याने सध्या वादंग माजले आहे. ही मते पीठासीन अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने बाद केली त्याचे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध आहे आणि ते न्यायालयाला सादर करण्यात आले आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली नव्या निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी सर्वेाच्च न्यायालयत केली असून त्यांनी नवनिर्वाचित महापौरांना कामकाज करण्यास मनाई करावी अशीही मागणी केली आहे.