मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – महाराष्ट्रात काही दिवसांपासून पावसाची हजेरी दिसून येत आहे. सोमवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही वरुणराजा बरसणार आहे. हवामान विभागाकडून (आयएमडी) कोकण विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकला असून 30 सप्टेंबर 2023 रोजी दक्षिण कोकण किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर केंद्रित झाला. रविवारी रात्रीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कोकण-गोवा किनारा, पणजी ते रत्नागिरी दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे.
1 ऑक्टोबर रोजी 12.15 रात्री नवीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड या भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जमीन खचण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.





