महत्वाची बातमी : मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता; रेड अलर्ट जारी

मुंबई – भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबईत आज शुक्रवारी दुपारी 1:00 वाजल्यापासून पुढील 24 तासांपर्यंत रेड अलर्ट जारी केला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे विविध नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आता मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्यानुसार लोकांनी वेळापत्रकांचे नियोजन करावे अशी सूचना हवामान खात्याने केली आहे. राज्य सरकारची आपत्ती निवारण यंत्रणा आणि मुंबई महापालिकेची यंत्रणा यांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.मुंबई आणि ठाण्यात 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 9 जुलैपर्यंत रेड अलर्टवर तर 10 जुलैला ऑरेंज अलर्टवर आहेत. पालघर 8 जुलैला रेड अलर्टवर आहे.
गुरुवारी मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे जलमय झाला होता. बुधवारी शहरातील अनेक भागात भीषण पाणी साचल्याची नोंद झाली. दादर आणि सायन भागात पाणी साचले असून पवई तलाव मंगळवारी सायंकाळी ओसंडून वाहू लागला. मुंबई शहरात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत असून, त्यातून अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी मुसळधार पावसात मुंबईतील घाटकोपरच्या पंचशील नगरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. बुधवारी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याजवळ भूस्खलनाची नोंद झाली, तथापि, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गढी नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा किंचित खाली आहे.





