AFG VS AUS : अफगाणिस्तान मोठा उलटफेर करणार कि वानखेडेची पुनरावृत्ती होणार? काय आहे सेमीफायनलचं समीकरण?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा म्हणजेच करो या मरो असा आहे. या सामन्यात जो जिंकेल त्या संघाचे सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म आहे. तर दुसरा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अफगाणिस्तान उलटफेर करणार की ऑस्ट्रेलिया वानखेडेची पुनरावृत्ती करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
2023 मध्ये देखील दोन्ही संघ आमने – सामने
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज जशी दोन्ही संघासमोर परिस्थिती निर्माण झाली आहे.तशीच परिस्थिती यापुर्वी 2023 च्या आयसीसी वर्ल्ड कप दरम्यान दोन्ही संघासमोर निर्माण झाली होती. मात्र त्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या हाता तोंडातला विजय खेचून आणला होता. वानखेडेवर रंगलेल्या त्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 292च लक्ष ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे अवघ्या 91 धावात 7 विकेट पडले होते.
यादरम्यान अफगाणिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना ग्लेन मॅक्सवेल संघासाठी धावून आला. त्याने झुंजार खेळी करत डबल सेंच्यूरी मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील पराभवामुळे अफगाणिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मॅक्सवेलच्या या झुंजार खेळीचे त्यावेळेस प्रचंड कौतुक झाले होते. कारण अफगाणिस्तानविरूद्ध एकाकी झूंज देताना मॅक्सवेलला प्रचंड वेदना होत होत्या, त्याला धावाही काढता येत नव्हत्या, त्यामुळे तो मैदानावर व्हिवळत होता.प्रचंड वेदना होत असतानादेखील हार न मानता संघाच्या विजयात मॅक्सवेलने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
आजदेखील दोन्ही संघामध्ये परिस्थिती तिच आहे. फक्त स्टेडियम वेगळे आहे. पण आव्हान तेच आहे. आज जर अफगाणिस्तान संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर संघ सेमी फायनलमध्ये थेट प्रवेश करणार आहे. जर कांगारू संघ अफगाणिस्तानविरुद्ध हरला तर त्या परिस्थितीत जर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले, तर ऑस्ट्रेलियन संघही अफगाणिस्तानसह उपांत्य फेरीत पोहोचेल.





