ICC Champions Trophy 2025: पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंच्या दृष्टीने ही स्पर्धा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांच्या संघातील स्थानाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी देखील यासंदर्भात वक्तव्य केल्याने आता या खेळाडूच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
गेल्याकाही सीरिजमध्ये भारतीय संघातील प्रमुख खेळाडू त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. रोहित, विराट सारखे प्रमुख खेळाडूच मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत असल्याने याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर देखील पाहायला मिळत आहे. याशिवाय, कोच गौतम गंभीर यांची संघातील निर्णयात असलेली भूमिका, संघातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणे, यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा काही भारतीय क्रिकेटपटूंच्या भविष्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुमार कामगिरी
मागील काही सीरिजमध्ये भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मायदेशात खेळल्या गेलेल्या टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंडने भारताचा 3-0 असा पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताचा 1-3 असा पराभव झाला. त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला 0-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहलीने 5 टेस्टमधील 9 इनिंग्समध्ये 23.75 च्या सरासरीने केवळ 190 धावा केल्या. या सीरिजमध्ये त्याने केवळ एक शतकी खेळी केली. तर या सीरिजमधील 5 इंनिंग्समध्ये रोहितला फक्त 31 धावा करता आल्या. खराब फॉर्ममुळे त्याला सीरिजमधील शेवटच्या सामन्यातूनही वगळण्यात आले.
न्युझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितने 15.16 च्या सरासरीने फक्त 91 धावा केल्या. तर विराटने या सीरिजमध्ये 15.50 च्या सरासरीने 93 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंव्यतिरिक्त इतर खेळाडूंनाही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली करता आली नव्हती.
देशांतर्गत क्रिकेटपासून लांब
भारताच्या प्रमुख संघात खेळणारे क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटपासून लांब राहत असल्याचे दिसून आले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू गेली अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाच खेळलेले नाहीत. याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशांतर्गत स्पर्धेपासून लांब राहिल्यास खेळाडूंवर कारवाई देखील होणार आहे.
संघात अंतर्गत वाद
एकमागोमाग होणाऱ्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघात अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. मीटिंग्समधील अनेक महत्त्वाचे निर्णय सार्वजनिकरित्या समोर येत आहेत. कोच गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्येही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील 5व्या व निर्णायक सामन्यातून नियमित कर्णधार रोहित शर्माला वगळावे की नाही, यावरूनही भरपूर चर्चा रंगली. रोहित व गंभीर यांना एकमेकांचे निर्णय पटत नसल्याने भारतीय संघात दोन गट पडल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र, नंतर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना दोघांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते.
बीसीसीआयने लागू केले नवीन नियम
क्रिकेटपटूंची सुमार कामगिरी पाहता बीसीसीआयने पावले उचलली आहेत. खेळाडूंना शिस्त लागावी व संघातील एकजुटता वाढावी यासाठी 10 कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांतर्गत प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असेल. याशिवाय, वैयक्तिक कर्मचारी, कुटुंबातील सदस्य, सराव सत्र यासंदर्भात देखील महत्त्वाचे नियम करण्यात आले आहेत.
या नियमांचे पालन न केल्यास खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू या नियमांचे पालन करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ठरणार भारतीय क्रिकेटपटूंचे भविष्य?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा या खेळाडूंच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेने जोर पकडला आहे. 6 महिन्यांपूर्वीच भारताला टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता क्रिकेटपटूंचे भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कामगिरीवर अवलंबून असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी देखील यावर भाष्य केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खेळाडूंबाबत विचार करू, असे आगरकर म्हणाले आहेत. खेळाडूंनी वयाची 35शी देखील गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारणार व प्रमुख खेळाडू कशी कामगिरी करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. एकप्रकारे, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी संघाचे नेतृत्व याच खेळाडूंकडे असणार की तरूण क्रिकेटपटूंकडे संघाची धुरा सोपवली जाणार, हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निकालावर अवलंबून असेल.