प्रभात वृत्तसेवा जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या वर्षातील आठ उत्सवांपैकी महत्वपूर्ण समजला जाणारा उत्सव म्हणजे चंपाषष्ठी (षडरात्रोत्सव)बुधवारी (दि.२६) पहाटेची नित्य भूपाळी, पूजा, अभिषेक, आरती झाल्यानंतर पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ, विश्वस्त यांच्या हस्ते बालद्वारी येथील देवांचे घट उठविण्यात आले. पहाटेच्या पूजेमध्ये नगरीतील ग्रामस्थांच्या मानाच्या पूजा झाल्या. खंडेराया – म्हाळसादेवी – बाणाईदेवींना पुरणपोळी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीच्या पिठाचा रोडगा अर्पण करण्यात आला. नगरीतील ग्रामस्थांच्या घराघरातील घट उठविण्यात आले. तळीभांडार -दिवटी पाजळणे, कोटांबा पूजन, आदी धार्मिक विधी करण्यात आले. तत्पूर्वी मंगळवारी (दि.२५) रात्री घडशी समाज बांधवांचा सनईच्या मंगलमय सुरात वाजतगाजत खंडोबा गडावरून- चावडीपर्यंत “तेल हंड्याची “मिरवणूक काढण्यात आली. गावचे पाटील, तेली समाज बांधव, माळी बांधव यांच्यासह मानकरी यांनी तेल हंड्याला मान दिला. तेलहंडा पुन्हा गडावर दाखल होत देवांचा तेलवण-चौक मांडणे हा धार्मिक विधी करण्यात आला. सहा दिवस चंपाषष्ठी उत्सव अन्नदान, सेवा मंडळाचे पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान समिती यांच्या वतीने गडकोट आवारात हरिद्रामार्जन पूजा, मल्हारी सहस्त्रनाम याग, होमहवन, देवदिवाळी, लोककलावंतांचा जागर, भक्तिगीते, मल्हारगीते, भाविकांसाठी महाप्रसाद, अन्नसेवा, आदी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. गडकोट आवरासह मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुख्य मंदिर गाभारा दररोज पानाफुलांनी सजविण्यात येत होता. सांगता उत्सवाचे अखेरच्या दिवशी दोन हजार किलो वांग्याची भाजी, भाकरी असे महाप्रसादाचे आयोजन केले होते. उत्सवावेळी देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ, कर्मचारी, अधिकारी, मंदिरातील उपासक पुजारी, सेवेकरी, विशेषतः घडशी समाज बांधवांसह मानकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. चंपाषष्ठी उत्सवाचे महात्म्य मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा या दिवशी मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवशंकरांनी “मार्तंड भैरवाचा उग्र अवतार धारण केला. पाच दिवस दोन दैत्यांबरोबर युद्ध करून एकाचा वध तर एक दैत्य शरण आला. ऋषीगणांनी हा विजयोत्सव साजरा करताना भंडाऱ्याची उधळण करीत देवांचा जयजयकार केला. देवांना दिपीकेने दिवटी ओवाळले. तो दिवस म्हणजे “मार्गशीर्ष महिन्यातीलच चंपाषष्ठी होय. परंपरेनुसार हा उत्सव साजरा होत असतो. विशेषतः श्रावण महिन्यापासून चातुर्मास सुरू होतो. काही घराण्यांमध्ये कांदा, वांगे खाणे वर्ज्य करतात. चंपाषष्ठी दिवशी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर पुन्हा हे पदार्थ खाण्यास सुरुवात होते. नवरात्रोत्सवा इतकेच खंडेरायाच्या षड:रात्रोत्सवाला महत्व आहे.