चंपाई सोरेन यांचा झामुमोला रामराम; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश

रांची : भाजप प्रवेशासाठी सज्ज झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी अपेक्षेप्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) रामराम ठोकला. झामुमोचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याविषयीचे पत्र त्यांनी पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांना पाठवले. झामुमोची सध्याची कार्यपद्धती, धोरणे यामुळे मी व्यथित झालो आहे. त्यातून मला पक्ष सोडणे भाग पडत आहे, असे चंपाई यांनी पत्रात नमूद केले.
ते झामुमोची प्रदीर्घ साथ सोडणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी नेमकी स्पष्टता नव्हती. त्यातून ते नवा राजकीय पक्ष स्थापणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, त्यांनी मंगळवारी सस्पेन्स संपवत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी ३० ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
चंपाई झामुमोच्या नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी चंपाई यांनी उचललेल्या पाऊलांमुळे त्या राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत.





