पिंपरी | जुनी सांगवीतील मुख्य चौकात चेंबरला भगदाड

सांगवी, (वार्ताहर) – जुनी सांगवीतील संविधान चौकात रस्त्याच्या मधोमध असलेला चेंबर वारंवार तुटत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या चौकातील चेंबरला चांगल्या दर्जाचे झाकण बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी भागातून औंध, पुणे, वाकड, हिंजवडी व इतर भागात जाण्यासाठी या रस्त्याचा नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सांगवी फाटा महात्मा फुले उड्डाण पुलाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जुनी सांगवीतील संविधान चौक या ना त्या कारणाने चर्चेत राहत आहे.
या चौकात सुशोभीकरण करताना महापालिकेकडून दोन म्युरल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहचालकांची तारांबळ उडते. अनेकदा दुचाकी धडकून अपघातही झाले आहेत. त्यातच भरीस भर याच चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेला चेंबर वारंवार तुटून मोठे भागदाड पडत आहे. मात्र, महापालिकेकडून चांगल्या दर्जाचे झाकण बसवून हा प्रश्न कायमचा सोडविण्याची तसदी घेतली जात नाही.
निवडणुकीमुळे अधिकार्यांना नाही वेळ
संविधान चौकात चांगल्या दर्जाचे चेंबरचे झाकण बसविणे गरजेचे आहे. मात्र, ते उपलब्ध नसल्याचे कारण महापालिका अधिकार्यांकडून दिले जात आहे. लोकसभा निवडणूक ड्युटी असल्याने समस्यांकडे लक्ष द्यायला अधिकार्यांना वेळ नाही. त्यामुळे या चौकातील चेंबरचे काम गेल्या 15 दिवसांपासून रखडले आहे.





