चुरशीच्या लढती : नेहरू विरुद्ध लोहिया

लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात अनेक लढती या चुरशीच्या, लक्षवेधी आणि गाजलेल्या ठरलेल्या आहेत. अशीच एक लढत आहे 1962मधील. या लढतीतील उमेदवार होते डॉ. राम मनोहर लोहिया आणि पंडित जवाहरलाल नेहरु. फुलपूर लोकसभा मतदारसंघातून लढलेल्या या दोन्ही उमेदवारांचा सामना देशभरात चर्चिला गेला. वैचारिकदृष्ट्या लोहिया आणि नेहरु हे पूर्णतः भिन्न विचासरणीचे होते. नेहरुंशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे लोहियांनी स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसशी आपले नाते तोडले.

1949 मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना हिंद किसान पंचायतीचे अध्यक्ष बनवले. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. लोहियांनी जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना एकत्र करत तत्कालीन सरकारच्या धोरणांविरोधात लखनौमध्ये एक महामोर्चा काढला. 1951 मध्ये “रोजी रोटी कपडा दो, नही तो गद्दी छोड दो’ असा नारा देत त्यांनी केंद्र सरकारविरोधाची धार तीव्र केली होती. पुढे 1962 मध्ये लोहियांनी थेट नेहरुंविरुद्ध निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. नेहरुंचा पारंपरिक मतदारसंघ असणाऱ्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. या निवडणुकीदरम्यान लोहियांनी नेहरुंवर दोन मोठे आरोप लावले. एक म्हणजे देशातील दोन तृतियांश जनतेला दररोज दोन आणेही नशीबात नसताना नेहरुंवर रोज 25 हजार रुपये खर्च होत आहेत. दुसरा आरोप म्हणजे नेहरुंनी मनात आणले असते तर गोवा पूर्वीच स्वतंत्र झाला असता. पण त्यांनी तसे केले नाही. साहजिकच या सनसनाटी आणि जनतेत खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांमुळे जनमानस ढवळून निघाले.
प्र

चारादरम्यान एकदा लोहिया म्हणाले की, मला माहीत आहे की नेहरुंचा विजय निश्‍चित आहे. पण मला तो अनिश्‍चितमध्ये बदलायचा आहे. कारण त्यामुळे देश वाचणार आहे आणि नेहरुंनाही सुधारण्याची संधी मिळणार आहे. तथापि, या निवडणुकीत नेहरुंना 1,18,931 मते मिळाली आणि लोहियांना केवळ 54,360. पुढे 1963 मध्ये फरुखाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये लोहियांनी विजय मिळवला आणि ते संसदेत दाखल झाले. संसदेत आल्यानंतर लगेचच त्यांनी नेहरु सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.