आव्हाने

आधुनिक भारताच्या विकासाची सुरुवात ही स्वातंत्र्यानंतर सुरू झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली तरी आजही अनेक समस्या आहेतच.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हातात जेव्हा देश आला तेव्हा देशाची अवस्था बिकट होती. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावर पूर्ण कपडे नाहीत अशा परिस्थितीत संपूर्णपणे कर्जबाजारी झालेला देश सांभाळणे हे आव्हानात्मक होते. परंतु, देशाचा विकास करण्यासाठी कायमस्वरूपी विकास आराखडा असला पाहिजे या उद्देशाने देशात “पंचवार्षिक योजना’ सुरू झाल्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले.
सन 1956 पासून ते सन 1962 या द्वितीय पंचवार्षिक योजनेत औद्योगिकीकरणावर भर दिला गेला. विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही या भावनेतून भारतीय शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली राधाकृष्णन समिती स्थापन करण्यात आली. देशात ठिकठिकाणी आयआयटी आणि आयआयएम सारख्या जागतिक संस्था उभे करण्याचा मानस पंडित नेहरूंनी बोलून दाखवला.
भारतीय नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी या उद्देशातून देशात “एम्स’ची स्थापना करण्यात आली. इतर प्रगत राष्ट्रांप्रमाणे भारताची अवकाश भरारी इस्रोच्या नेतृत्वात सुरू झाली. देशाला आण्विक सामर्थ मिळवून देण्याचा प्रयत्न डॉ. होमी भाभा जहांगीर यांच्या प्रयत्नाने सुरू झाला. सन 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताच्या विकासाला पुढील काही काळासाठी खीळ बसली. युद्धातील पराभवामुळे जागतिक राजकारणात भारताची नाचक्की झाली. पराभवाच्या धक्क्यातून देश सावरतो तोच सन 1964 मध्ये पंडित नेहरू यांचे निधन झाले. भारताला हा बसलेला दुसरा धक्का होता.
पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पदाची शपथ घेतल्यापासूनच देशात असलेल्या अन्नधान्याचा तुटवड्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. देशातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी स्वतः शास्त्रीजींनी पंतप्रधान निवासाच्या आवारात शेती करण्यास सुरुवात केली. पुढे “जय जवान, जय किसान’चा नारा देत संपूर्ण देश शेतकरी आणि सैन्याच्या मागे उभा केला. शास्त्रीजींच्या प्रयत्नांना पुढे यश आले.
देशात विविध ठिकाणी कृषी विद्यापीठे स्थापन झाली. अन्नधान्यांची उत्पादकता वाढविण्यावर संशोधन सुरू झाले. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली देशात हरितक्रांती झाली आणि एकेकाळी अर्धपोटी राहणारा भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. दुर्दैवाने हा दिवस पाहण्यास शास्त्रीजी हयात नव्हते.
अमेरिका व सोव्हिएत रशिया यांनी भारताला महासंगणक देण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतातच महासंगणक निर्मितीचा निर्णय घेतला. ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात महासंगणक निर्मितीस सुरुवात झाली. देशात जागोजागी टेलिफोन बूथ लावले गेले. दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आली.
भारताची गेल्या 75 वर्षांतील प्रगती असली तरी आजही अनेक आव्हाने भारतासमोर उभी आहेत. भारताला याचा मुकाबला येणाऱ्या काळात करावा लागणार आहे.
सुरक्षा
1) पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद भारतासमोरील प्रमुख समस्या असून अजूनही त्यावर भारताला नियंत्रण मिळवता आले नाही. 2) चीनची वाढती आक्रमकता भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी असून भविष्यात त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. 3) देशातील अनेक जिल्ह्यांत नक्षलवाद आजही आपले अस्तित्व राखून आहे.
सामाजिक
1) गेल्या 75 वर्षांपासून देश एकसंध असला तरी जातीपाती आणि धर्मांमधील तेढ अजूनही संपलेली नाही. 2) अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे उद्योग आजही देशात अनेक ठिकाणी सुरू आहेत.
रोजगार
1) सेंटर फॉर मॉनिटरींग रिसोर्सच्या अहवालानुसार मार्च 2021 मध्ये भारतातील 75 लाख नागरिकांनी आपले रोजगार गमावले असून गेल्या 59 वर्षांतील हा उच्चांक आहे. 2) रोजगारामध्ये स्त्री-पुरुष असमानता आजही मोठ्या प्रमाणावर दिसते.
आरोग्य
1) भारतातील “प्रायमरी हेल्थ केअर’ क्षेत्राची अवस्था अत्यंत खराब असून ती सुधारणे गरजेचे आहे. 2) देशातील मोठ्या शहरात हॉस्पिटलची सुविधा असली तरी ग्रामीण भारतात डॉक्टर आणि हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. 3) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार केंद्राने आपल्या जीडीपीच्या कमीत कमी 2 टक्के खर्च, राज्याने जीडीपीच्यी कमीत कमी 1 टक्के खर्च आरोग्य सुविधेवर करणे आवश्यक आहे. पण भारतात हा खर्च 1.5 टक्क्यांच्या वर कधीही गेला नाही. 4) उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्ये येथील आरोग्य व्यवस्था अत्यंत खराब असून ती सुधारणे आवश्यक आहे.
शिक्षण
1) भारतात शिक्षणावर आजही कमी पैसा खर्च केला जातो. 2) “असर’च्या अहवालानुसार भारतातील शिक्षणाची गुणवत्ता ही खालावलेली असून ग्रामीण भारतातील परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. याशिवाय भारतासमोर लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी, ब्रेनड्रेन, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या असून त्याचे निराकरण होणे गरजेचे आहे. भारताला अजून मोठी मजल मारायची असून त्यासाठी सरकार आणि जनता यांचा एकत्रित सहभाग आवश्यक आहे.
नोंद
स्वप्निल श्रोत्री





