प्रभात वृत्तसेवा चाकण – पुणे-नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीने आधीच त्रस्त झालेल्या चाकणकरांना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची भर पडली असल्यामुळे मनस्ताप होत आहे. फळ विक्रेते व शेतीमाल विकणारे व्यावसायिक यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.या कोंडीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बस रांगेत अडकतात. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होऊन विद्याथ्यांचे नुकसान होत आहे. गर्दीच्या वेळी वादविवाद, भांडणे, तसेच मोबाईल आणि वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच फळे व शेतीमालाची किरकोळ विक्री सुरू असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. अतिक्रमण करणार्या फळ विक्रेत्यांवर आणि रस्त्यावर विक्री करणार्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि नगरपरिषदेने वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच शेतीमाल आणणार्या व्यापारी व नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व विक्रीची ठराविक जागा निश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेंद्र गोरे यांच्या म्हणण्यानुसार नगरपरिषदेने रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या फूटपाथवर फलविक्रेते आणि शेतमाल विकणार्यांनी अतिक्रमण करून हातगाडी तसेच फूटपाथवर बसून व्यवसाय करत असल्यामुळे सकाळच्या वेळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. “कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळोवेळी नगरपरिषदेला व पोलीस प्रशासनाला याबाबत पत्र व्यवहार केला केला असून याबाबत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले. शेतीमाल ने -आन करणार्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बाजार समितीने जागा उपलब्ध केलेली आहे.” -महेंद्र गोरे, संचालक खेड बाजार समिती “प्रशासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घातले तर, वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही. रोज सकाळी बाजार समिती समोरील रोडवर वाहतूक कोंडी होत असते. मुलांना शाळेत घेऊन जाणारी बस यायला उशीर होतो त्यामुळे मुलांना शाळेत जायला उशीर होतो. पर्यायाने यात मुलांना आणि पालकांना याचा रोज त्रास सहन करावा लागत आहे.” -विजय खळदकर, स्थानिक नागरिक