प्रभात वृत्तसेवा चाकण – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांच्या आदेशानुसार चाकण शहर हद्दीतील वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम तिसर्या दिवशीही सुरूच राहिली. आज (दि. 12) झालेल्या कारवाईत तब्बल 42 मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला.ही संयुक्त कारवाई महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), चाकण नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून तळेगाव-शिक्रापूर महामार्ग परिसरात करण्यात आली. या कारवाईत पीएमआरडीएचे रवी रांजणे व त्यांचे पथक, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व त्यांचे संपूर्ण पथक तसेच महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाचे निला व त्यांचे सहकारी सक्रिय सहभागी झाले होते. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, नगर परिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे. तसेच अनधिकृत मालमत्ता असल्यास त्या गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या कारवाईमुळे तळेगाव-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.