चाकण एमआयडीसीत अवैध धंद्यांना ऊत

* खराबवाडी, महाळुंगे, निघोजे, वासुलीतील स्थिती
* गावातील सामाजिक शांतता, सुरक्षितता धोक्यात
शिंदे वासुली (वार्ताहर): चाकण एमआयडीसीचे खराबवाडी, महाळुंगे, निघोजे व वासुली हे चारही प्रभाग विकसित होत असताना अवैध धंदे, चोऱ्या, लुटमार अशा समाजघातक अपप्रवृत्तींना ऊत आला आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक, प्रवासी, वाहनचालक व कामगार चिंताग्रस्त झाले असून येथील सामाजिक शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
एमआयडीसी भागातील प्रत्येक गावात एक तरी हातभट्टीची दारू काढणे व विक्री व्यवसाय असतोच. हे आजवरचे चित्र होते; परंतु पूर्वीच्या चाकण पोलीस ठाण्यात असणारी 22 गावे वगळून पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अंतर्गत महाळूंगे पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. आता तरी असे व्यवसायांवर कारवाई होऊन आळा बसेल, अशी अपेक्षा करणाऱ्यांची मात्र घोर निराशाच झाली. कारण ते अवैध व्यवसाय अजुनही सर्रास सुरूच आहेत.
शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे या एमआयडीसी बाधीत गावांमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. अगदी मुख्य रस्त्यालगत, भर लोकवस्तीत देशी, विदेशी मद्य विक्री होत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाते असे पोलीस प्रशासनाकडून सांगेतले जात आहे. मग ते व्यवसाय पुन्हा कसे सुरू आहे? त्यांच्यावर कोणाची मेहरबानी आणि का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मग हातभट्टी पासून दारु तयार करणारा व्यवसाय तर लांब रानावनात, निर्जन ठिकाणी चालतो. त्याच्यावर तर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
हातभट्टीमध्ये रसायन मिसळून दारू काढली जाते. ती कधी कधी इतकी विषारी असते की पिणाऱ्याच्या जीवाला धोकाही होतो. इतर मद्यांच्या तुलनेत ही हातभट्टीची दारु कमी किमतीत मिळते. म्हणून अत्यंत कष्टमय व हलाखीची परिस्थिती असणारे लोक, आर्थिक परिस्थितीने गरीब असणारा समाज या हातभट्टीच्या आहारी गेला आहे. अनेकांचे संसार उद्ध्ववस्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन असे अवैध धंदे व व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. कारवाई करुन बंद केलेले व्यवसाय पुन्हा सुरू होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.





