Chain Snatching – हिंदू धर्मात सौभाग्य लेणं मानलं जाणारं सोनं आता महिलांच्या जिवावर बेतू लागलं आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीने नवे विक्रम प्रस्थापित केले असताना, शिरूर शहरासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी अक्षरशः थैमाण घातले आहे. भररस्त्यात काही सेकंदांत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका छोट्या सोनसाखळीची किंमत लाखांच्या घरात गेल्याने गुन्हेगार आता महिलांच्या जिवाशी खेळायलाही मागे-पुढे पाहत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या महिला, देवळाबाहेर, बाजारपेठेत किंवा किराणा दुकानात येणाऱ्या महिलांना चोरटे लक्ष्य करत आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने किंवा दुकानात खरेदी करण्याच्या निमित्ताने महिलांच्या जवळ जाऊन क्षणात गळ्यातील ऐवज हिसकावून पोबारा केला जातो. अगदी घरासमोर उभ्या असलेल्या महिलाही आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. चोरी करण्याची पद्धत अत्यंत वेगवान असून, अनेकदा दोन जण दुचाकीवरून येतात. एक जण वेगाने साखळी ओढतो आणि दुसरा गाडी पळवून नेतो. पीडित महिलेला सावरायला वेळ मिळण्यापूर्वीच चोरटे गायब होतात. साखळी ओढताना अनेक महिलांना गंभीर दुखापतही झाली आहे. यामुळे ‘सौभाग्याचं लेणं घालायचं की जीव वाचवायचा?’ असा प्रश्न महिलांना पडला आहे. सोन्याचे वाढते दर. (संग्रहित छायाचित्र) आधी बिबट्याची भीती अन् आता चोरट्यांची शिरूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची भीती असल्याने महिला शेतात एकट्या जात नव्हत्या. आता सोनसाखळी चोरांची भर पडल्याने महिलांनी दागिने घालणेच बंद केले आहे. मंगळसूत्र घातले तरी ते पदराआड लपवून ठेवण्याची वेळ आली असून, घराबाहेर पडताना सौभाग्याचे प्रतीक आता भीतीचे कारण ठरत आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट, पण गुन्हेगार सरस पोलिसांकडून गस्त आणि सीसीटीव्ही तपास सुरू असला, तरी गुन्हेगार अधिक चलाख झाले आहेत. विना नंबरच्या दुचाकी, हेल्मेट किंवा मास्कचा वापर करून हे गुन्हे केले जात आहेत. काही टोळ्यांमध्ये तर महिलांचाही वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोन्याचे वाढलेले दर अन् चोरट्यांचा सुळसुळाट सोन्याचे दर वाढणे हे चोरांसाठी ‘फायदेशीर व्यवसाय’ ठरत आहे. जोपर्यंत किमती वाढत राहतील, तोपर्यंत असे गुन्हे रोखणे आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे महिलांनी गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने टाळावेत आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.