डकार (सेनेगल) – चाडचे माजी पंतप्रधान आणि विरोधी नेते सक्सेस मासरा यांना देशाच्या गुन्हेगारी न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना द्वेष पसरवणे, बंड भडकावणे आणि हत्येतील सहभागाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. मे महिन्यात शेतकरी आणि गुराखी यांच्यात झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर हे आरोप करण्यात आले होते. मसरा यांना १ अब्ज सीएफए फ्रँक किंवा जवळजवळ १.८ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला. कोर्टरूममधून बाहेर पडण्यापूर्वी मसरा यांनी आपल्या समर्थकांना खंबीर राहा, असा संदेश दिला. मसरा याना फक्त अवहेलना आणि अयोग्य अपमान सहन करावा लागला आहे. ते शिक्षेविरुद्ध अपील करतील, असे निकालानंतर मसरा यांचे वकील काडजिलेम्बे फ्रान्सिस यांनी पत्रकारांना सांगितले. मध्य आफ्रिकेतल्या चाड देशाच्या नैऋत्येकडील लोगोन ऑक्सीडेंटल येथे मे महिन्यात पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला होता. हा संघर्ष घडवून आणल्याच्या आरोपाखाली मसरा आणि न्गाम्बे वांशिक गटातील ६७ लोकांवर खटला चालवला गेला. या हिंसाचारात ३५ जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. मसरा यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मसरा हे गेल्या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान पंतप्रधान राहिले होते. लेस ट्रान्सफॉर्मेटर्स पक्षाचे ते प्रमुख आहेत आणि चाडचे विद्यमान अध्यक्ष महामत डबी यांचे ते तीव्र टीकाकार आहेत.