Satara | छ. शिवाजी महाराजांचे चरित्र युवा पिढीने अभ्यासणे आवश्यक

सातारा, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेची काळजी घेणारा राजा होता. शिस्तप्रिय, गुणवंताचे कौतुक करणा-या राजाचे चरित्र युवा पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे. प्रा. रमणलाल शहा यांनी ९० व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट ग्रंथ रुपाने आणल्याने युवा वर्गास वाचनातून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल, असे मत माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ जिल्हा बँकेच्या सभागृहात झाला.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, शिवसेनेचे उपनेते (ठाकरे गट) नितीन बानुगडे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,
रयतचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, सहसचिव पी. एन. पवार, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सातारा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. चेतना माजगावकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती
या सोहळ्यात प्राचार्य रमणलाल शहा सरांचा विशेष मानपत्र व शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. रमणलाल शहा म्हणाले, छत्रपती शिवरायांचे चरित्र नव्या पिढीला समजावे त्यांची जिद्द आत्मविश्वास धैर्य आणि लढा वृत्ती नव्या पिढीला समजण्यासाठीच हे लेखन मी केले आहे.
आपल्या प्रेमामुळेच मी ही तेरा पुस्तके लिहू शकलो. राजघराण्याचा पाठिंबा मला लाभला तसेच अनेकांचे प्रेम यातूनच हे ग्रंथ निर्मितीचे काम मी पूर्ण करू शकलो .
माजी आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, प्राचार्य शहा यांनी 13 पुस्तकाचे लेखन केले. राजघराण्याचा वारसा जपण्याचा व ते वृद्धिंगत करण्याचं लेखनातून काम हे विस्तृत शिवचरित्र लिहून शहा सरांनी केले आहे. वयाची ९१ व्या वर्षात त्यांच्यातील जिद्द आणि उर्मी ही खरोखरच इतरांना स्फूर्ती देणारी आहे.
नितीन बानुगडे पाटील म्हणाले, शिवरायांचा घडलेला इतिहास नव्या पिढी पुढे आणण्याचे आद्य आणि महत्त्वाचे काम शहा सरांनी केले आहे. या ग्रंथ निर्मितीमध्ये इतिहास खऱ्या अर्थाने अनुभवता येत आहे.
शिवरायांच्या चरित्रातील असा कुठलाच प्रांत, शास्त्र, विषय नाही की ज्याचा अभ्यास या शिवचरित्रात आपला पाहायला मिळेल व छ. शिवरायांनी हे खरोखरच दाखवून दिले होते. शिवचरित्र हे माणसे घडवण्याचे चालते, बोलते विद्यापीठ आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शहा सरांचे आणि आमच्या राजघराण्याचे तब्बल तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे लोटली. शिवरायांचा अपेक्षित इतिहासच आजपर्यंत इतिहासकारांनी मांडला नाही.
मात्र, संशोधनातून शहा सरांनी या ग्रंथ निर्मितीचे जे काम केले ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचे आणि वेगळ्या पद्धतीने मांडण्याचे कामच आतापर्यंत झाले.
ज्यातून विवाद निर्माण होतील ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिवजयंतीच्या तारखेबाबतचा वादही असाच एक उदाहरण म्हणून येथे पाहता येईल. हे ग्रंथ निर्मितीचे कार्य खरोखरच शहा सरांकडून झाले हा एक विशेष गौरवाचा असा हा सन्मान सोहळा आहे.
सुजित शेख यांनी केले सूत्रसंचालन केले. नितीन शहा यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. संदीप श्रोत्री, हेमंत बर्गे, युवराज पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संयोजनासाठी नितीन शहा, सौ. केतन शहा, हर्ष शहा, रोहित शहा, सौ. नेहा शहा-दावडा व सौ. अंकिता शहा, चंद्रकांत चिंचकर यांनी परिश्रम घेतले.





