प्रभात वृत्तसेवा पुणे – देशातील आयआयटी, एनआयटीसह नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या अंतर्गत राज्य सीईटी सेलकडून घेण्यात येणारी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी वर्षातून दोन वेळा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांतून धोर धरू लागली आहे. त्यातच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, एमबीए, अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सीईटी आता दोन वेळा घेण्याबाबत चाचपणी सुरू केल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात राज्य शासनाची सीईटी दोन वेळा होणार का, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सीईटी सेलतर्फे राज्यभरात ७३ अभ्यासक्रमांसाठी १९ विविध सीईटी परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, विधी अशा काही मोजक्या अभ्यासक्रमांसाठी लाखभरापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देतात. अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटीसाठी तीन-चार लाख विद्यार्थी बसतात. लाखो विद्यार्थ्यांचा समावेश असणाऱ्या सीईटी दोनदा घेण्याचा विचाराधीन असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. खासगी विद्यापीठांकडील ओघ मंदावणार.. या अभ्यासक्रमांच्या सीईटी उशिरा होत असल्याने स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम देणाऱ्या अनेक नामांकित संस्था तथा खासगी विद्यापीठ विद्यार्थ्यांना स्वतःकडे आकृष्ट करतात. हे टाळण्यासाठी जानेवारी महिन्यात पहिली सीईटी आणि एप्रिल महिन्यात दुसरी सीईटी घेण्याचा विचार सध्या राज्य स्तरावर सुरू आहे. मात्र, याच काळात संपूर्ण देशभरात जेईई परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रांची उपलब्धता होणे कठीण आहे. त्यातच सध्या सीईटी कक्षाकडे स्वतःची परीक्षा केंद्रे नाहीत. त्यानुसार दोन वेळा सीईटीचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. अहवालानंतरच निर्णय.. यंदा जानेवारीत सीईटी जाहीर झाली, तर विद्यार्थ्यांना तयारीसाठी कालावधी कमी मिळेल; पण तरीही २७ जानेवारीच्या आसपास परीक्षा घेण्याबाबत चाचपणी होत आहे, तसेच जानेवारी-एप्रिल पॅटर्न न राबवता मार्चअखेरीसच १५ दिवसांच्या अंतरात दोन सीईटी घेता येतील का, याबाबतही सीईटी कक्षाकडून अहवाल मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीईटी कक्षाकडून अहवाल आल्यानंतरच जानेवारी-एप्रिल, की मार्चअखेरीस १५ दिवसांच्या अंतरात दोन संधी, याचा निर्णय होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी.. दोन सत्रांमध्ये सीईटीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला, तर त्यांना पहिल्या सत्रातील गुण सुधारण्याची संधी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होईल. केवळ एका परीक्षेच्या कामगिरीवर अवलंबून न राहता, त्यांना सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा सीईटीचा निर्णय राज्य शासनाने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.