Mumbai-Pune expressway : मुंबई ते बेंगळुरू प्रवास अवघ्या पाच तासांत करणे शक्य करणाऱ्या नव्या एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील पागोटे ते चौक या पहिल्या टप्प्याचे काम ५,००० कोटी रुपयांत केले जाणार आहे. नव्या एक्सप्रेसवेची वैशिष्ट्ये- गडकरी यांनी सांगितले की, नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होईल. हा रस्ता पुण्याच्या आऊटर रिंग रोडला जोडला जाणार आहे. अटल बोगद्यापासून दोन किलोमीटर अंतरावरून हा मार्ग सुरू होऊन JNPT (जवाहरलाल नेहरू बंदर) ओलांडत पुढे जाणार आहे. पुणे रिंग रोडपासून बेंगळुरूच्या दिशेने स्वतंत्र मार्गिका विकसित केली जाणार आहे. केंद्र सरकारने नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी आधीच १०० मीटर रुंद जमीन संपादित केली असून या मार्गावर १६ लेन विकसित केले जाणार आहेत. तीन पॅकेजमध्ये काम होणार पहिल्या पॅकेजमध्ये पागोटे ते चौक हा टप्पा असेल. पुणे रिंग रोड ते बेंगळुरू या दिशेने आणखी दोन पॅकेजचे नियोजन सुरू आहे. या दोन पॅकेजमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मिळून २०२ किलोमीटरचा नवा पुणे-बेंगळुरू मार्ग विकसित केला जाणार आहे. या नव्या रस्त्यामुळे पुणे ते बेंगळुरू प्रवास ४ तासांत आणि मुंबई ते बेंगळुरू प्रवास ५ तासांत होणे शक्य होणार आहे. विद्यमान एक्सप्रेसवेवरील ताण कमी होणार नवीन एक्सप्रेसवेमुळे सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ५० ते ६० टक्क्यांनी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. JNPT ते पुणे दरम्यान जड वाहतूक नव्या रस्त्यावरून वळवली जाणार असल्याने विद्यमान एक्सप्रेसवेवरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गासाठी ८,००० कोटींचा DPR जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासासाठी ८,००० कोटी रुपयांचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला असल्याचे नमूद करत त्याच्या विकासाचे निर्देश दिले होते, असे गडकरी यांनी सांगितले. पालखी मार्ग जवळपास पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आळंदी आणि देहू ते पंढरपूर या पालखी मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मात्र पंतप्रधानांना बोलावण्यापूर्वी ते स्वतः रस्त्याने प्रवास करून काम नियोजनानुसार झाले आहे का हे तपासणार आहेत. हा वार्षिक वारीचा महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाचे नियोजनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग ९५ टक्के पूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ते स्वतः प्रवास करणार आहेत. आधीच मोठा विलंब झाल्याने उद्घाटन समारंभ आयोजित करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी थेट उद्घाटनाऐवजी महामार्ग खुला करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.