मोठी बातमी: 78 लाख पेन्शनधारकांना मोदी सरकारची भेट, आता कोणत्याही बँकेतून पैसे काढता येणार

CPPS – 78 लाख पेन्शनधारकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. 1 जानेवारी 2025 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून आणि देशाच्या कोणत्याही भागातून पेन्शन काढण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय श्रम-रोजगार मंत्री आणि EPF केंद्रीय न्यायिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मनसुख मांडविया यांनी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधील सुमारे 78 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन जवळच्या बॅंकेतून काढण्याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चा कर्मचारी निवृत्त झाल्यावर कर्मचारी पेन्शन योजना- 1995 अंतर्गत दरमहा एक निश्चित पेन्शन दिली जाते. आतापर्यंत निवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन काढण्यासाठी तो ज्या क्षेत्रातून सेवानिवृत्त झाला आहे त्या संबंधित बँकेच्या शाखेत यावे लागते.
वास्तविक EPFO वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात फक्त काही (तीन किंवा चार) बँक शाखा पेन्शन काढण्यासाठी अधिकृत आहेत, ज्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागते. कारण सेवानिवृत्तीनंतर बहुतांश कर्मचारी आपल्या गावात किंवा अन्य भागात राहू लागले तरी त्यांना पेन्शन काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता नवीन सुविधेमुळे त्यांचे हे कष्ट कमी होणार आहेत.
Union Minister Dr. Mansukh Mandaviya approves Centralized Pension Payments System (CPPS) for pension under EPS 1995; more than 78 Lakh EPS pensioners to be benefitted. He says, “EPS Pensioners to get pension from any bank, any branch, anywhere in India from 1st January 2025.”:… pic.twitter.com/2HoqtDB8WE
— ANI (@ANI) September 4, 2024
EPFO च्या आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल – मांडविया
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया म्हणाले की, CPPS ची मंजूरी EPFO च्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. ही पेन्शनधारकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, जी आता पूर्ण होत आहे. यामुळे पेन्शनधारकांना आता देशाच्या कोणत्याही भागातून त्यांच्या सोयीनुसार पेन्शन काढता येणार आहे. प्रगत आयटी आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शन काढण्याचे मोठे फायदे होतील.
पेन्शन पेमेंट हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही –
नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, पेन्शनधारकांना पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. सध्या, सेवानिवृत्तीनंतर एखादी व्यक्ती दुसऱ्या प्रदेशात गेल्यास, त्याला त्या प्रादेशिक कार्यालयासाठी पीपीओ हस्तांतरित करावा लागतो. त्यानंतर ते कार्यालय बँकेच्या शाखेचे वाटप करते जिथून पेन्शन काढता येते परंतु हा सर्व त्रास CPPS मध्ये संपेल. आता 1 जानेवारीपासून, CPPS चा लाभ EPFO मध्ये चालू असलेल्या सेंट्रलाइज्ड IT सक्षम प्रणाली (CITES) 2.01 अंतर्गत उपलब्ध होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात आधार-आधारित पेमेंट सिस्टम (ABPS) देखील लागू केली जाईल.





