केंद्र सरकारची ममता सरकारवर कुरघोडी; मुख्य सचिवांची केली बदली

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींबरोबरच्या कालच्या चर्चेला उपस्थित न राहिल्याने केंद्र सरकारने आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा कुरघोडी करीत पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनाच केंद्रीय सेवेत परत बोलावले आहे.
अलपन बंडोपाध्याय असे बंगालच्या मुख्य सचिवांचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांची निवृत्ती होणार होती; परंतु त्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यांना उर्वरित काळासाठी केंद्र सरकारी सेवेत आपले तीन महिने व्यतित करावे लागणार आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या कृतीवर पश्चिम बंगाल सरकारतर्फे जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कधीच असा प्रकार घडला नव्हता असे त्यांनी म्हटले आहे. बंडोपाध्याय यांना दिल्लीत 31 मे पर्यंत पाठवावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून पश्चिम बंगाल सरकारला करण्यात आली आहे. मोदींनी काल यास चक्रीवादळाच्या संबंधात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी पाचारण केले होते.
तथापि त्या या बैठकीला आल्या नाहीत. या बैठकीसाठी राज्यपालांनाहीं थेट केंद्रातर्फे निमंत्रण दिले गेले होते. त्यावेळी केंद्राने राज्य सरकारचे मत विचारात घेतले नव्हते. आता केंद्राने मुख्य सचिवांना दिल्लीत बोलावून घेतले आहे.
बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच केंद्र सरकार अशा कुरघोड्या करीत जनतेवर सूड उगवत आहे असा आरोप तृणमूल सरकारने केला आहे.





