ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारचे निर्बंध; नजारा टेक्नॉलॉजीज, ऑनमोबाईल ग्लोबलच्या शेअर्समध्ये मोठी घट

मुंबई – केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बुधवारी घट झाली. नजारा टेकनोॉलॉजीज या कंपनीचा शेअर 13 टक्क्यांनी घसरला. ऑनमोबाईल ग्लोबल या कंपनीच्या शेअरचा भावही साडेतीन टक्कंनी कोसळला.
आमच्या कंपनीचा रिअल मनी गेमिंगशी कसलाही संबंध नाही असे नजारा टेक्नॉलॉजीज या कंपनीने निवेदन जारी केले आहे. मात्र तरीही गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची विक्री केली. सरकारने यासंदर्भात मांडलेले विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे. यामुळे गेमिंगचे व्यसन लागते. त्याचबरोबर मनी लॉन्ड्रींग आणि इतर आर्थिक गुन्हेगारी वाढते असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र या क्षेत्रातील कंपन्यांनी या आरोपाचा वेळोवेळी इन्कार केलेला आहे.
ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल. तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा, जाहिरातींच्या रूपाने पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेयकात आहे.
तसंच या कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद हे विधेयक करतं. याद्वारे, अशा गेम्समध्ये फसवणूक होऊन नागरिकांवर, विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल.





