केंद्र सरकारकडून नवउद्योजकांना २० लाखांचे विनातारण कर्ज; ‘तरुण प्लस’ योजनेतून हजारो तरुण बनले उद्योजक

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नवउद्योजकांना उद्योग सुरू करणे सोपे व्हावे याकरिता मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुण प्लस ही कॅटेगिरी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत 34,697 लाभार्थ्यांना 4,930 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत उपलब्ध केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या योजनेच्या अंतर्गत देशभरातील तरुणांना व्यवसायिक बँका उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करीत आहेत. या योजनेचा पाठपुरावा अर्थ मंत्रालय करीत असून वेळोवेळी या योजनांचा आढावा घेण्यात येत असतो.
तरुण संवर्गाअंतर्गत या अगोदर ज्या तरुणांनी कर्ज घेऊन त्याची परतफेड केली आहे अशा व्यक्तींना 2024- 25 मध्ये अधिक कर्ज देण्यासाठी तरुण प्लस योजना सुरू करण्यात आली होती. तरुण प्लस योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तीला विनातारण वीस लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करण्यात येते.
सितारामन यांनी सांगितले की, ज्या लोकांना हे कर्ज दिले आहे ते लोक या कर्जाचा उपयोग संबंधित कामासाठीच करीत आहेत का याची शहानिशा कर्ज उपलब्ध केलेल्या बँका करीत आहेत. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीवर परिणाम होणार नाही अशी आशा आहे.
जनधन योजना यशस्वी –
एका दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना सितारामन म्हणाल्या की सर्व समावेशक विकासासाठी ऑगस्ट 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली जनधन योजना कमालीची यशस्वी झाली आहे. ही योजना अधिक यशस्वी व्हावी यासाठी बँका गरीब खातेदाराशी संपर्क साधत आहेत. बँकांच्या विविध योजनांचा कशाप्रकारे उपयोग करावा याची माहिती देत आहेत. यासाठी बिझनेस करस्पॉन्डन्टना प्रशिक्षित करण्यात येत आहे.





