“केंद्र सरकार कर्जबाजारी” ;माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची टीका

मंचर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. केंद्र सरकार कर्जबाजारी झाले असून आर्थिक अडचणीत सापडले आहे, अशी टीका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी वळसे पाटील बोलत होते. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, माजी सभापती संजय गवारी, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, अनिल वाळुंज, अजय आवटे, मथाजी पोखरकर, निलेश थोरात, सरपंच उत्तमराव टाव्हरे, उपसरपंच भरत टाव्हरे, महेश टाव्हरे, अनिल चव्हाण, सानिका टाव्हरे, निर्मला टाव्हरे, शुभांगी टाव्हरे, हनुमंत बारवे, जयवंत मेंगडे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून, प्रत्येक वर्षी दोन कोटी मुलांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले होते.
मात्र तरुणांना व तरुणींना नोकरी मिळत नसल्याने तरुण-तरुणी वणवण फिरत आहेत. यावेळी विष्णूकाका हिंगे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक सरपंच उत्तमराव टाव्हरे यांनी, सूत्रसंचालन अमित कातळे यांनी तर माजी उपसरपंच अशोक टाव्हारे यांनी आभार मानले.





