पुणे जिल्हा | कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तारासाठी केंद्राने निधी द्यावा

नारायणगाव, (वार्ताहर) – कृषी तंत्रज्ञान तळागळातील शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांना सक्षम करून विस्तार कार्यासाठी केंद्र शासनाने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.
कृषी विज्ञान केंद्राला रविवारी (दि.25) पवार यांनी भेट दिली त्यावेळी बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जगन्नाथ शेवाळे, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर,
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, उपाध्यक्ष सुजित खैरे,कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक डॉ. आनंद कुलकर्णी,
शशिकांत वाजगे, डॉ. संदीप डोळे,एकनाथ शेटे, अरविंद मेहेर, ऋषिकेश मेहेर,तानाजी वारुळे, डी.के. भुजबळ, देवेंद्र बनकर, ऋतुपर्ण मेहेर, रत्नदीप भरविरकर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, जुन्नर तालुक्यात आंबा, केळी, द्राक्ष उत्पादनात भरीव काम झाले आहे. ऊस उत्पादनात काम करण्यास वाव असून कृषी विज्ञान केंद्राच्या विविध तंत्रज्ञानाचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांनी घेणे आवश्यक आहे.
मोबाइल अॅपद्वारे शेतकर्यांना पाऊस, तापमान, हवामानातील बदल, बाष्पीभवन, कीड, पिकांवरील रोग आदी व इतर आवश्यक माहिती मिळणे आवश्यक आहे. देशभरात कृषी विद्यापीठ, केंद्र शासन व खासगी संस्थांची कृषी विज्ञान केंद्र आहेत.
परंतु देशातील खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणार्या कृषी विज्ञान केंद्रांचा दर्जा उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पवारांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली.तसेच फवारणी ड्रोन विषयी माहिती घेतली.
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे सादरीकरण डॉ. प्रशांत शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घाडगे यांनी तर आभार कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी मानले.
या बद्दलची घेतली माहिती
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे पाऊस, हवामानातील बदल, आद्रता,बाष्पीभवन बाबींच्या माहितीच्या आधारे गरजेनुसार पाणी, खत व फवारणी व्यवस्थापन करून उत्पदान खर्चात बचत करणे, उत्पादन वाढ,
ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे आणि अद्यावत हवामान प्रणालीचा किफायतशीर शेतीत फायदेशीर याविषयी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.





