Parliament Winter Session : सीमा वादात केंद्राने हस्तक्षेप करावा – सुप्रिया सुळे

नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादात केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत केली.
लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना सुळे म्हणाल्या की, दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असूनही महाराष्ट्रातील लोकांना दररोज मारहाण होत आहे. गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करीत आहेत. महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्ये करीत आहेत.
सीमाभागातील मराठी जनतेवर अत्याचार होत असून वाहनांची तोडफोड देखील होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. सुळे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, हा संवेदनशील मुद्दा आहे आणि तो दोन राज्यांमधील विषय आहे. त्यामुळे त्यावर लोकसभेत अधिकची चर्चा उपस्थित करता येणार नाही असे त्यांनी नमूद केले. या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.
दरम्यान, सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आम्ही सर्वजण सातत्याने लढा देत आहोत. हा लढा संवैधानिक मार्गाने कायम राहील हा आमचा निर्धार आहे. असे देखील खासदार सुळे यावेळी सांगितले.





