पिरंगुट -येथील श्री चिंतामणी मंदिरात द्वारयात्रा व चिंतामणी उत्सवास सुरुवात करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर थेऊर (ता. हवेली) येथे श्री चिंतामणीचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न होऊन विश्वातून करोनामुक्ती होऊ, अशी प्रार्थना करण्यात आली. मोरया गोसावी यांचे वंशज पिरंगुटकर देव कुटुंबीय व श्री गणपती देवस्थान पिरंगुटतर्फे चिंतामणी मंदिरात सात दिवस मोठ्या प्रमाणात चार द्वारयात्रा व चिंतामणीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी पिरंगुटकर देव कुटुंबीयांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून चिंतामणीचा उत्सव कमी लोकांमध्ये पण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. प्रथेप्रमाणे श्री चिंतामणीची महापूजा, नैवेद्य तसेच धार्मिक कार्यक्रम पार पडला. पहाटे तीन वाजता महासाधू श्री मोरया गोसावी, श्री चिंतामणी महाराज व श्री नारायण महाराज यांनी रचलेल्या पदांची धुपारती केली. श्री चिंतामणीची दृष्ट काढण्यात आली. यावेळी सकल विश्वातून करोनामुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली.