शिवतिर्थावर आज सोहळा

उद्धव ठाकरेंसोबत प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी!
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद
3 डिसेंबरनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुुंबीयांनाही आमंत्रण
मुंबई – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत.
शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीसोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून शिवतीर्थावरील जागेचा पोलिसांनी ताबा घेतला आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील 400 शेतकऱ्यांना तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असल्याने राज्यभरात शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आले असून दादरचा परिसर भगवामय झाला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज सायंकाळी होत असून त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये केवळ एकच उपमुख्यमंत्रिपद राहणार असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहील असा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने स्थापन केलेले सरकार अवघ्या 80 तासांत कोसळले. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेच आमंत्रण दिले असून या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी सायंकाळी शपथविधी होतो आहे. त्यांच्यासोबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दोन कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत हे पद कॉंग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार आहे. मात्र विधानसभेचे अध्यक्षपद मिळाल्याने आता कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचं मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्री पदासह 16 मंत्रिपद, राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील. उदय सामंत, संजय राठोड, अनिल परब, यांची नावं निश्चित समजली जात आहेत.
आघाडीला 169 आमदारांचा पाठिंबा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 169 वर पोहोचली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला अवघे 24 तास उरले असताना बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी केली आहे. हितेंद्र ठाकूर, त्यांचा मुलगा क्षितिज आणि राजेश पाटील या तीन आमदारांनी आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 288 सदस्यांच्या सभागृहात आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 169 वर पोहोचली आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
स्टॅलिन, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांना निमंत्रण
देशात कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी ही माहिती दिली.
जयंत पाटलांकडे उपमुख्यमंत्रिपद?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी प्रथम अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु बंडामुळे त्यांच्या जागी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चिन्हं असून, त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, तसेच विद्या चव्हाण यांचाही समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे
कॉंग्रेसने विधानसभा अध्यक्षपद मिळावे यासाठी आग्रह धरला होता व त्यासाठी प्रसंगी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. अखेर अध्यक्ष पद कॉंग्रेसला देण्यात आले. मंत्रिपदासाठी कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पडवी, विश्वजित कदम, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत.





