Mere Husband Ki Biwi Movie: अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले असून, या घटनेत काहीजण जखमी झाले आहेत. ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटाचे मुंबईतील रॉयल पाम्सच्या इम्पीरियल पॅलेस येथे शूटिंग सुरू होते. यावेळी अचानक सेटवर छत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेवेळी सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज सेटवर उपस्थित होते. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग सुरू होते. यावेळी मोठ्या आवाजामुळे कंपन निर्माण झाल्याने ही दुर्घटना घडली. बराच वेळ गाण्याचे शूटिंग सुरू होते. त्यामुळे मोठ्या आवाजाने निर्माण होणाऱ्या कंपनामुळे सेट हादरू लागला व त्यानंतर छत कोसळल्याचे सांगितले जाते. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. चित्रपटाच्या गाण्याचे कोरियोग्राफर विजय गांगुली यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, पहिल्या दिवसाचे शूटिंग व्यवस्थित पार पडले. दुसऱ्या दिवशी देखील सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सायंकाळी छत कोसळले. सुदैवाने छत टप्प्याटप्प्याने कोसळले. पूर्ण छत एकदाच कोसळले असते, तर मोठा धोका निर्माण झाला असता. या दुर्घटनेत दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना इजा झाली आहे. डीओपी मनू आनंदचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. तसेच, विजय गांगुली यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, ‘मेरे हसबंड की बीवी’ हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 ला रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.