सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ वाढवला, 30 मे 2026 पर्यंत राहणार पदावर

नवी दिल्ली: केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत (यापैकी जे आधी असेल) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जनरल चौहान हे सीडीएस आणि लष्करी व्यवहार विभागाचे (डीएमए) सचिव म्हणून कार्यरत राहतील.
जनरल अनिल चौहान 1981 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे डिसेंबर 2021 मध्ये एका अपघातात निधन झाले. त्यानंतर सीडीएस पदासाठी पात्रतेच्या निकषात सरकारने बदल केले, ज्यामुळे लेफ्टनंट जनरल दर्जाचे अधिकारी आणि या दर्जावरून निवृत्त झालेले अधिकारीही सीडीएस पदासाठी पात्र ठरले. जनरल अनिल चौहान हे लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना 30 सप्टेंबर 2022 रोजी सीडीएस म्हणून नियुक्त केले गेले आणि आता त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे.
थिएटर कमांडच्या गरजेवर प्रश्नचिन्ह –
सीडीएस म्हणून जनरल चौहान यांच्यासमोरील पहिले प्रमुख काम थिएटर कमांड स्थापन करणे होते. मात्र, अद्याप ही कमांड प्रत्यक्षात आलेली नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर थिएटर कमांडच्या गरजेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकतेच हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी सांगितले की, सध्या खालच्या स्तरावर नवीन संरचनेसाठी (थिएटर कमांड) गरज नाही. दुसरीकडे, भारतीय सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी थिएटर कमांडचे फायदे सांगत त्याची आवश्यकता अधोरेखित केली.
इंटिग्रेटेड थिएटर कमांडवर काम सुरू –
सध्या भारतीय सेनेत 7, हवाई दलात 7 आणि नौदलात 3 अशा एकूण कमांड आहेत. या सर्वांना एकत्रित करून इंटिग्रेटेड थिएटर कमांड स्थापन करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या नियुक्तीपासून सुरू झाली. यासंदर्भात अनेक चर्चा झाल्या आणि काही प्रगतीही झाली आहे. जनरल अनिल चौहान यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी सीडीएस पद स्वीकारल्यानंतर थिएटर कमांडच्या नव्या प्रस्तावावर काम सुरू झाले. सध्याच्या प्रस्तावानुसार, एकूण तीन थिएटर कमांड स्थापन होणार आहेत: एक पाकिस्तान सीमेसाठी, एक चीन सीमेसाठी आणि एक मेरीटाइम कमांड.

