कराड पालिकेतील सीसीटीव्ही यंत्रणा वादात

कराड – कराड नगरपालिकेतील विविध घडामोडींवर करडी नजर ठेवणारे सीसीटीव्ही आणि संबंधितीत प्रोग्रॅम फॅसिलीटी विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या विभागाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोयीप्रमाणे रेकॉर्डिंगचा वापर करण्याचे राजकारण कराड पालिकेत सुरू असून सभेतील रेकॉर्डिंगसह आवारातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या प्रोग्रॅम फॅसिलिटी व्यवस्थापकाची मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी चौकशी करून अहवाल द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
कराड नगरपालिकेचा आवार, प्रांगणासह सभागृहात चांगल्या दर्जाचे कॅमेरे दोन वर्षांपूर्वी बसवण्यात आले आहेत. त्यात पालिकेत घडणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड होत आहे. मात्र, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सोयीस्कर वापर केला जात आहे. पालिकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या रेकॉर्डची कोणी मागणी केली की, रेकॉर्डिंग गायब होते. पालिकेत दंगा झाला की, रेकॉर्ड गायब असते. मात्र, पालिकेत कोणी टाळे ठोकले की, त्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित पोच केले जाते. असे प्रकार वारंवार घडले आहेत.
सभागृहातील बैठकींचेही रेकॉर्डिंग कायम गायब असते. अर्थात ते रेकॉर्डिंग गायब करणाऱ्या अधिकाऱ्याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे, याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागणी करूनही सीसीटीव्ही फुटेजचे काही रेकॉर्ड मिळत नसल्याने नगरसेवकही वैतागले आहेत. रेकॉर्डिंग गायब करण्याचा प्रकार पालिकेच्या प्रोग्रॅम फॅसिलिटी व्यवस्थापकांच्या चांगलाच अंगलटही आलेला आहे. पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार व्यवस्थपकांची यांची चौकशी सुरू आहे.
पालिकेच्या मासिक सभेत झालेल्या चर्चेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग अधिकार नसतानाही गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या विभागचे प्रमुख गांगुर्डेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी सचिन पवार यांनी दिलेले आहेत. त्यानुसार मुख्याधिकारी सविस्तर चौकशी करत आहेत.
चुकीवर पांघरूण घालण्याचा पालिकेचा प्रयत्न
पालिकेच्या मासिक ऑनलाइन सभेचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळण्याची मागणी करूनही गांगुर्डे यांनी त्यामध्ये हेराफेरी केल्याचे पुढे येत आहे. पालिका स्तरावर त्याची चौकशी होऊन करवाई होईल. मात्र, चुकीवर पांघरून घालण्याचा प्रकार सध्या पालिकेत सुरू आहे. पालिकेतील सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी आहेत.त्यांचा दर्जा अतिशय खराब आहे. त्यामुळे ते बदलून नवे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पालिका सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.





