प्रभात वृत्तसेवा पुणे : पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरात सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवण्याचे आदेश महापालिकेने ठेकेदाराला दिले आहेत. पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पालिकेने दिनेश इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीस खोदकामाची परवानगी दिली आहे. मात्र, ठेकेदाराने खोदकामाच्या नियमाचे उल्लंघन करत एकाचवेळी शहरभर खोदकाम सुरू केले आहे. शहरभर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याची दखल घेत पालिकेने खोदकामाला स्थगिती दिली आहे.पालिकेने खोदकामाची परवानगी देताना ठेकेदारांना काही नियम घालून दिले आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पध्दतीने आणि एकाच वेळी संपूर्ण शहरात खोदाई सुरू आहे. त्यामुळे, महापालिकेकडे मोठया प्रमाणावर पुणेकरांनी तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने संबंधित एजन्सीची परवानगी तत्कालीन प्रभावाने स्थगित केली आहे. तसेच, या पूर्वी खोदाई केलेल्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करावी, त्या दुरूस्तीची माहिती तसेच फोटो सादर करावेत. त्यानंतरच पुढील खोदाई बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्र पालिकेच्या पथ विभागाने कंपनीस दिले आहे. महापालिकेने शहरात अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उभारलेले फूटपाथ पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी पुन्हा उखडले आहेत. तसेच नव्याने केलेले रस्तेही खोदण्यात आले आहेत. पोलीस शहरात २८०० ठिकाणी सीसीटीव्ही बसविणार आहेत. त्यासाठी ५०० किलोमीटर खोदाईची परवानगी दिली आहे. त्यासाठी महापालिकेने कंपनीस एकाच वेळी सगळीकडे परवानगी दिली आहे. मात्र हे काम करताना कंपनीने पालिकेच्या खोदाई धोरणानुसार हे काम करणे अपेक्षित आहे.त्यात, सुरक्षिततेची उपाययोजना, खबरदारी आणि खोदाई–तत्काळ पुनर्स्थापना अट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराकडून काम करताना शहरात कुठेही प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याचे पथ विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. त्यातच, शहराच्या मध्यवर्ती व अतिवर्दळीच्या पेठांमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि फुटपाथवर खोदाई करून त्याची पुनर्स्थापना वेळेवर न केल्याने नागरिकांना फुटपाथवरून जाणे कठीण झाले असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, पाचशे मीटर खोदाई केल्यानंतर त्या संपूर्ण भागाची त्वरित पुनर्स्थापना करणे आणि त्यानंतरच पुढील खोदाई सुरू करणे ही स्पष्ट अट असूनही तिचे कोठेही पालन होत नाही. त्यामुळे नियमभंग, आलेल्या तक्रारी आणि शहराचे विद्रूपीकरण लक्षात घेऊन पालिकेने ही खोदाई थांबविण्य़ाचे आदेश कंपनीस दिले आहेत.