सचिन वाझेंच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज गायब?

मुंबई – अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटके प्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाल्यांनतर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एनआयएकडून वाझे यांच्या घराच्या परिसरासह इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात आहे. परंतु, सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर गायब झाल्याचे समोर आले असून हे वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी नेले असल्याचे समोर येत आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर क्राईम इंटेलिजन्स युनिटने (CIU) पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए वाझे यांच्या घराजवळील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरच्या शोधात होती. मात्र, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी तपासाचे कारण देत नेल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, वाहनांच्या नोंदणी क्रमांक तयार करणाऱ्या अन्य दुकानातही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील दुकानदारांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी डीव्हीआरबरोबर नोंद वही तपासासाठी सोबत नेली.
सचिन वाझेंच्या भावाची हायकोर्टात धाव
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या भावाला एनआयएने बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन अटक केली आहे, असा दावा सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म वाझे यांनी हेबियस कॉर्पस याचिकेच्या माध्यमातून या अटेकलाच हरकत घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्याचा आदेश एनआयएला द्यावा, अशी विनंती त्यांनी ऍड. सनी पुनमिया यांच्यामार्फत न्यायालयाला केली आहे. तसेच दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवला आहे, असा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.





