लाखो बॅंक खातेदारांची ‘ती’ तक्रार पोचली ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडं; RBIला हस्तक्षेपाचं आवाहन

नवी दिल्ली – व्यवहार पूर्ण झाला नाही तर संबंधित पैसे बॅंक ग्राहकाच्या खात्यात वेळेवर टाकले जात नाहीत. त्याचबरोबर व्यवहार रद्द झाल्यास पैसे लवकर परत मिळत नाहीत.
अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हस्तक्षेप करून संबंधित ग्राहकांना त्यांचे पैसे वेळेवर परत करण्याबाबत प्रयत्न करावा असे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे.
प्राधिकरणाच्या आयुक्त निधी खरे यांनी रिझर्व्ह बॅंकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्याकडे बॅंक ग्राहकांच्या अशा प्रकारच्या 2,850 तक्रारी आल्या आहेत. बॅंका असे पैसे संबंधित ग्राहकांच्या खात्यात पाठवीत आहेत. मात्र रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हे पैसे मिळत नाहीत.
बॅंकांनी यासंबंधातील वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. रिझर्व्ह बॅंक ही बॅंकांची नियंत्रक संस्था असल्यामुळे बॅंकांबरोबर रिझर्व्ह बॅंकेने या विषयावर चर्चा करावी. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेला आवश्यक ते सहकार्य करण्याची आमची तयारी आहे असे खरे यांनी म्हटले आहे.
व्यवहार पूर्ण न होणे किंवा रद्द होणे, याचबरोबरच बॅंकाअंतर्गत केलेल्या व्यवहाराबाबत ही काही तक्रारी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.




