पुणे | सीबीएसईच्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल जाहीर झाला असून, पेपर एकमध्ये १ लाख २७ हजार १५९, तर पेपर दोनमध्ये २ लाख ३९ हजार १२० उमेदवार पात्र ठरले.
सीबीएसईने देशभरातील १३६ शहरांत विविध केंद्रांवर ७ जुलै रोजी सीटीईटी परीक्षा घेतली होती. त्यामध्ये ६० टक्के गुण मिळवणारे उमेदवार पात्र ठरतात. यंदा पेपर एकसाठी ८ लाख ३० हजार २४२ उमेदवारांनी नोंदणी केली. ६ लाख ७८ हजार ७०७ शिक्षकांनी परीक्षा दिली.
त्यातील १ लाख २७ हजार १५९ उमेदवार उत्तीर्ण झाले, तर पेपर दोनसाठी नोंदणी केलेल्या १६ लाख ९९ हजार ८२३ उमेदवारांपैकी १४ लाख ७ हजार ३३२ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी २ लाख ३९ हजार १२० उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे डीजीलॉकरद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीबीएसईने दिली आहे.




