CBSE Exam | राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत शैक्षणिक पद्धतीमध्ये अनेक मोठे बदल केले जात आहेत. या सुधारणा प्रक्रियेतील एक भाग म्हणून आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वाच्या मसुद्याला मंजूरी दिली आहे. आता यापुढे सीबीएसई बोर्डाने यापुढे दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मसुद्याला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये 10 वीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सीबीएसई दहावीच्या परीक्षेचे वर्षातून दोनदा आयोजन करण्याचा निर्णय शैक्षणिक वर्ष 2026 पासून लागू होणार आहे. शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित बैठकीत या धोरणांमध्ये बदल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरी सुधारणा करणे, त्यांच्यावरील ताण कमी करणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे आता 2026 पासून 10वीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहेत. ही परीक्षा दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च आणि दुसरा टप्पा 5 मे 20 मे दरम्यान पार पडेल. दोन्ही परीक्षांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असेल. परीक्षा दोन वेळा पार पडणार असली तरीही प्रॅक्टिकल, इंटर्नल असेसमेंट वर्षातून एकदाच होईल.