CBSE चा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांना देता येणार नाही 12वी बोर्डाची परीक्षा; कारण काय?

CBSE Board Exam | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कठोर पावले उचलले आहे. 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.
याशिवाय, ज्या शाळा डमी स्कूल प्रणालीला प्रोत्साहन देत आहेत व गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नामांकित करत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असे सीबीएसईने म्हटले आहे.
बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘डमी शाळां’मध्ये प्रवेश घेतल्यास त्याचे परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहन करावे लागतील. सीबीएसई ‘डमी शाळां’विरुद्ध सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत परीक्षा नियमांमध्ये बदल करण्यावर विचार करत आहे. जेणेकरून, अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्यापासून रोखले जाऊ शकेल. अशा विद्यार्थ्यांना नॅशनल इंस्टिट्यूशन ऑफ ओपन स्कूलच्या माध्यमातून (एनआयओएस) परीक्षा द्यावी लागेल.
पीटीआयशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, जर तपासणी दरम्यान कोणताही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आढळला किंवा नियमित वर्गांमध्ये जात नसेल, तर त्याला बोर्ड परीक्षा देण्यापासून रोखले जाऊ शकते.
बोर्ड परीक्षेसाठी 75% हजेरी अनिवार्य
सीबीएसई गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीत शैक्षणिक सत्र 2025-26 पासून विद्यार्थ्यांसाठी किमान 75% हजेरी अनिवार्य असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई नियमांनुसार फक्त नोंदणी केल्यामुळे कोणताही विद्यार्थी बोर्ड परीक्षा देण्यासाठी पात्र होणार नाही. त्याला किमान 75% हजेरी पूर्ण करणे आवश्यक असेल., असे अधिकाऱ्याने सांगितले.
केवळ मेडिकल इमर्जेन्सी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग, किंवा इतर गंभीर परिस्थितींमध्ये 25% हजेरीची सवलत विद्यार्थ्यांना दिली जाईल.




