बसपा नेते के.आर्मस्ट्राँगच्या हत्येची सीबीआय चौकशी करा; मायावतींची मागणी

चेन्नई : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँगच्या हत्येचे प्रकरण जोर धरू लागले आहे. आता बसपा सुप्रीमो मायावती यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेले लोक खरे गुन्हेगार नसल्याचा दावा त्यांनी केला. मृत्युमुखी पडलेल्य बसपा नेत्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याची विनंती केली.बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांनी तामिळनाडू बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील पेरांबूर येथील एका खाजगी शाळेत ५२ वर्षीय नेत्याच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करण्यात आले. शनिवारी सायंकाळी उशिरा हल्लेखोरांच्या टोळक्याने ज्या पद्धतीने आर्मस्ट्राँगची हत्या केली त्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचे दिसून येते, असेही मायावती म्हणाल्या.
कायदा हातात घेऊ नका
बसपा नेत्याने सांगितले की, आर्मस्ट्राँगच्या हत्येनंतर राज्यभरातील दलित भयभीत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली. पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था स्वत:च्या हातात घेऊ नये. मी राज्य सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी. विशेषतः दुर्बल घटकांना सुरक्षित वाटले पाहिजे. सरकार गंभीर असते तर आतापर्यंत खरे आरोपी पकडले गेले असते. मात्र आता तसे नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी आमची राज्य सरकारला विनंती आहे.
खून बदलापोटी केला होता का?
गेल्या वर्षी गुंड अर्कोट सुरेशच्या हत्येशी या प्रकरणाचा संबंध असावा, असा पोलिसांना संशय आहे. सुरेशच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आर्मस्ट्राँगची हत्या झाली असावी, असे मानले जात आहे. उत्तर चेन्नई पोलीसांनी सांगितले की, आम्ही तपास करत आहोत. मागील खुनाच्या कारणावरून हा खून झाल्याचे दिसत आहे. आम्ही आठ जणांना अटक केली आहे. आम्ही सात रक्ताने माखलेली शस्त्रे, एक झोमॅटो टी-शर्ट, एक झोमॅटो बॅग आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. याआधी शनिवारी ग्रेटर चेन्नईचे पोलीस आयुक्त संदीप राय राठौर यांनी बसपा नेत्याच्या हत्येचा कोणताही राजकीय पैलू नाकारला होता.
आम्ही गप्प बसणार नाही
बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या, ‘आमच्या पक्षाने आर्मस्ट्राँगच्या हत्येची ही घटना गांभीर्याने घेतली असून आम्ही गप्प बसणार नाही. आमचे राज्य युनिट गप्प बसणार नाही आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आरोपींवर कारवाई करण्यासाठी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी पुढे यावे. पण त्याचवेळी कायद्याच्या मर्यादेत राहून दुर्बल घटक कायदा हातात घेत नाही हे दाखवून दिले पाहिजे.





