वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून अमेरिकेचे गुप्तचर खाते “एफबीआय’च्या प्रमुखपदी डोनाल्ट ट्रम्प यांनी 2017 नियुक्त केलेल्या क्रिस्तोफर रे यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रे आपला दहा वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा रशियाशी असणाऱ्या कथित संबंधाची चौकशी “एफबीआय’ने सुरू केली होती. जून 2017 मध्ये तत्कालीन प्रमुख जेम्स कोमे यांना ट्रम्प यांनी तातडीने निलंबित केले होते. त्यांच्या जागी रे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बायडेन यांच्या प्रसिद्धी सचिव जेन पास्की यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात थेट उत्तर देण्यास नकार दिला. अलीकडे आपण बायडेन यांच्याशी चर्चा केली नाही. एवढेच त्या म्हणाल्या. मात्र, गुरुवारी उशिरा त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. अध्यक्ष ज्यो बायडेन यांना “एफबीआय’च्या प्रमुखपदी रे यांनाच ठेवायचे आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर बायडेन यांचा पूर्ण विश्वास आहे, असे पास्की म्हणाल्या.
“एफबीआय’ प्रमुखाची मुदत 10 वर्षे असते. मात्र, दहा वर्षे पूर्ण करण्याची कोणतीही खात्री नसते. त्यांना अध्यक्ष काढू शकतात किंवा ते राजीनामा देऊ शकतात. बायडेन यांनी बुधवारी अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र स्वीकारल्यानंतर रे यांची नियुक्ती कायम ठेवण्याचा निर्णय झाला. बायडेन यांच्या या निर्णयाचे अंतर्गत गुप्तवार्ता समितीचे अध्यक्ष ऍडम स्चिफ यांनी स्वागत केले आहे.