मणिपूर हिंसाचाराचे पुणे कनेक्शन ! विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी CBI ने पुण्यातून एकाला पकडले

नवी दिल्ली – मणिपूर हिंसाचारप्रकरणी (Manipur violence) जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या प्रकरणी सीबीआयने (CBI) शुक्रवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी सीबीआयने पुण्यातून एका 22 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
सीबीआयने अटक केलेला तरुण हा दोन बेपत्ता मणिपुरी विद्यार्थ्यांच्या हत्त्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने बुधवारी पॉलुनमंग या तरुणाला पुण्यातून अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी गुवाहाटी येथे नेले. विशेष न्यायालयाने पॉलुनमंग याला 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
खरं तर, मणिपूर खोऱ्यात लागू करण्यात आलेली इंटरनेट (Internet ban) बंदी 27 सप्टेंबर रोजी पुन्हा लागू करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आणि खोऱ्यात हिंसाचाराची आग पुन्हा पेटली. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा 1 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेटवर बंदी घातली. सीबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह चार जणांना अटक केली होती. ही महिला मुख्य आरोपीची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आदिवासी संघटनांनी आरोपींच्या अटकेविरोधात आंदोलन सुरू केले.
3 मे पासून देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये जातीय संघर्ष सुरू आहे. सुरक्षा दलाचे हजारो जवान तैनात असूनही येथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही. काल गुरुवारी मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले होते. गावातून पळून गेलेल्या लोकांनी सांगितले की लष्कराने त्यांना आश्वासन दिले आहे की ते कुकी अतिरेक्यांना नागरिकांवर गोळीबार करू देणार नाहीत. गावकऱ्यांवर हल्ला करण्यासाठी अतिरेकी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत होते. सुरक्षा दलांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिल्यावर अतिरेक्यांना त्यांचे वाहन सोडून पळ काढावा लागला. यानंतर पोलिसांनी वाहनातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.





