पुणे | चंडिपुरा आजारापासून सावधता आवश्यक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेजारच्या गुजरात राज्यात “चंडिपुरा’ आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात त्याचे रुग्ण वाढू नयेत यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे. या आजारामध्ये १५ वर्षांखालील मुलांचे मृत्यूंचे प्रमाणही जास्त दिसून येत आहे.
मुलांना अचानक ताप येणे, वर्तणुकीत बदल होणे, झटके येणे आणि तत्काळ बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांना तत्काळ जवळच्या प्राथमिक आराेग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे. तसेच अशा प्रकारच्या रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करताना त्यांचे नमुने डेंग्यू/जेई/चंडिपुरा या तिन्ही आजारांसाठी तपासणीसाठी पाठवण्यात यावेत. यामुळे रुग्णांचे निश्चित निदान करण्यास मदत हाेईल, असे याबाबत देण्यात आलेल्या आदेशांमध्ये म्हटले आहे.
असा होतो “चंडिपुरा’ आजाराचा प्रसार
“चंडिपुरा’ आजाराचा प्रसार होण्यासाठी “सॅन्डफ्लाय’ नावाचा कीटक कारणीभूत आहे. तो घरातील अडगळीच्या जागी, भिंतीतील भेगा, गोठा आणि साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळतो.
तरी लोकांना आपल्या घर परिसर आणि प्रामुख्याने गोठ्यात स्वच्छता ठेवण्याबाबत शिक्षण दयावे. शेण घराजवळ न टाकता ते वस्तीपासून दूर टाकावे. चंडिपुरा उद्रेकग्रस्त गाव आणि त्याच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व गावांमध्ये घरोघरी नियमित कीटकनाशक फवारणी करावी. यात प्रामुख्याने गोठ्यांमध्ये आतून आणि बाहेरुन ४ फुटांपर्यंत फवारणी करावी.
नागरिकांनो, हे कराच
आपल्या घराच्या आजूबाजूला नाल्या, गटारात पाणी तुंबू देऊ नये आणि गटारी वाहती करावीत. शोष खड्डयांद्वारे पाण्याचा निचरा करावा. “सॅन्डफ्लाय’ कीटकापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शक्यतोवर मच्छरदाणीचा वापर करावा. झोपताना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल, असे कपडे वापरावेत. मुलांना भिंतीपासून दूर झोपवावे.
रुग्णालये, डाॅक्टरांसाठी सूचना
सरकारी रुग्णालयांत आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन आणि बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने सर्व समस्याग्रस्त जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे मेंदूज्वर रुग्णांच्या उपचाराबाबत सविस्तर प्रशिक्षण घेण्यात यावे, असे शासनाने म्हटले आहे.
सध्याचा “चंडिपुरा’ आजाराचा प्रसाराचा कालावधी पाहता ही साथ महाराष्ट्रातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याद्दष्टीने आपण खबरदारी घेण्यासाठी नागरिक, सर्व जिल्हा आणि महापालिकेच्या आराेग्य विभागाने खरबदारी घ्यावी. तसेच मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. – डाॅ. राधाकिशन पवार, राज्य आराेग्य विभागाचे सहसंचालक
असा पसरतो आजार
चंडिपुरा हा विषाणूजन्य आजार आहे. वाळूच्या असणाऱ्या परिसरातील कीटकांच्या प्रजाती आणि एडिस इजिप्ती (डेंग्यूचा डास) अशा प्रजाती या विषाणूच्या वाहक म्हणून ओळखल्या जातात. हा विषाणू या कीटकांच्या लाळ ग्रंथींमध्ये राहतो आणि त्यांना चावून मानवी शरीरात प्रवेश करतो. विषाणूमुळे होणारा हा संसर्ग मध्यवर्ती मज्जासंस्थेपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे एन्सेफ्लायटिस (मेंदूच्या ऊतींमध्ये सूज) होऊ शकतो.





