कोल्हापूर : देशातील लोकसंख्येत मागसवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा एकत्र वाटा हा 90 टक्के आहे. पण, हा 90 टक्के समाज मुख्य मैदानाच्या बाहेर आहे. देशाच्या बजेटमध्ये पैशांचे वाटप निश्चित होते. 100 रुपयांमधील फक्त 6 रुपये 10 पैंशाचा निर्णय हा 90 टक्के समाज घेतो. हा भेदभाव आम्ही दूर करणार आहोत. यासाठी जातीय जनगणना हा क्रांतीकारी उपाय आहे, असे मत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमधील संविधान सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले. काँग्रेस आणि इंडिया आघाडी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवणार. आम्ही सांगतो ते करतो, आम्ही नुसते आश्वासन देत नाही, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. देशातील 90 टक्के समाजाची सध्याची अवस्था दूर करण्यासाठी जातीय जनगणना हा दुसरा क्रांतीकारी उपाय आहे. या समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे हे कुणालाच माहिती नाही. हे कायदेशीर आधारावर कुणीही सांगू शकत नाही. जातीय जनगणनेच्या आधाराने ते स्पष्ट होईल. जातीय जनगणनेच्या आधारावर आम्हाला कुणाची किती लोकसंख्या आहे. तसेच या वर्गाची समाजातील अर्थव्यवस्थेवर किती पकड आहे याचे सर्वेक्षण आम्ही करणार, तसेच भारतामधील न्यायव्यवस्था, नोकरशाही, मीडिया यासारख्या प्रमुख संस्थांमध्ये किती मागसवर्गीय, दलित आणि आदिवासी आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येईल. जातीय जनगणना हा देशाचा एक्सरे आहे. जखम झाली हे आम्हाला माहिती आहे. नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी आम्हाला जातीय जनगणना हवी आहे. हे विधेयक आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत पास करुन दाखवणार, त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. कुणी कितीाही प्रयत्न केले तरी हे विधेयक पास होणार, असे गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यघटना मान्य नाही, पण भारतीय नागरिकांनी त्यांना राज्यघटना मस्तकी लावायला लावली. राज्यघटनेचे संरक्षण करण्याचे दोन उपाय आहेत. जातीय जनगणा आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणे हे ते दोन उपाय आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देशाच्या बाहेर घेतले. पण माझे शालेय शिक्षण देशामध्येच झाले. शाळेत मला अस्पृश्यतेबाबत, दलितांबद्दल किती पुस्तकं वाचायला मिळाली? किती धडे वाचायला मिळाले? याचा विचार मी करत होतो. पाठ्यपुस्तकात ओबीसींचा इतिहास कुठे आहे? ज्यांच्या हातामध्ये गुणवत्ता आहे त्याला मागे बसवले जाते. हे भारतामध्ये 24 तास घडत आहे. ज्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे, अशा वर्गाचा इतिहास आपल्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात नाही. आज तर त्यांचा इतिहासही पुसला जात आहे, असा आरोप गांधी यांनी केला.