व्यापाऱ्याला अडवून साडेचार लाखाची रोकड लंपास

श्रीगोंदा – काष्टी येथील व्यापारी अभय अमृतलाल मांडोत हे दौंडकडे जात असताना चौधरी मळ्याजवळ दोघा मोटारसायकलवरून आलेल्यांनी पाठलाग करून त्यांना अडविले. अभय मांडोत यांच्याकडील साडेचार लाखाची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
अभय मांडोत यांचे काष्टीत किराणा दुकान असून, ते दौंडला राहतात. नेहमीप्रमाणे रात्री नऊला दुकान बंद करून रात्री मोटारसायकलवरून दौंडला घरी जात होते. पाठीमागून एका मोटारसायकल आली. त्यांनी मांडोत यांची मोटारसायकलला आडवी लावली. मांडोत यांना खाली पाडले. मोटारसायकलची चावी काढून घेत साडेचार लाखांची रोकड घेऊन दौंडच्या दिशेने धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी अभय मांडोत यांनी फिर्याद दिली, मात्र पोलिसांनी त्यांना चार तास बसून ठेवले. त्यामुळे मांडोत यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत.





