पुणे – आर्थिक गैरव्यवहार करत ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांवर दाखल असलेल्या प्रकरणात आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीएचआर पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी २०२१ साली गुन्हा दाखल होता. त्यावेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त नवटक्के कार्यरत होत्या. नवटक्के यांची या प्रकरणात काय भूमिका आहे. त्यांच्यावर कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या पतपेढीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बीएचआरसी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.